मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (RTO) वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्र वितरणात गंभीर अनियमितता उघडकीस आली असून, परिवहन विभागाच्या चौकशीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आवश्यक सुरक्षा उपकरणे नसतानाही अनेक वाहनांना नियमबाह्य पद्धतीने फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
चौकशीनुसार, राष्ट्रीय परवाना असलेल्या काही वाहनांमध्ये Vehicle Location Tracking Device (VLTD) बसविण्यात आलेले नसतानाही त्यांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच १ जानेवारी २०१९ नंतर उत्पादित काही प्रवासी वाहनांमध्ये आवश्यक VLTD आणि काही परिवहन वाहनांमध्ये स्पीड लिमिट डिव्हाइस नसतानाही फिटनेस प्रमाणपत्र जारी करण्यात आल्याचे आढळले आहे. हा प्रकार वाहन सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानला जात आहे.
समितीच्या अहवालात पनवेल, पुणे, पिंपरी-चिंचवड, वाशी, ठाणे, अंधेरी, वडाळा, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील आरटीओ कार्यालयांमध्ये या अनियमितता झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.तसेच चर्चेत असणारे जिल्हे परभणी, हिंगोली ,नांदेड सुद्धा चौकशी च्या रडारवर आहेत . संबंधित सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “वाहनांची फिटनेस तपासणी ही केवळ कागदोपत्री प्रक्रिया नसून ती नागरिकांच्या जीविताशी थेट संबंधित आहे. नियमांना बगल देऊन अपात्र वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देणे हा अत्यंत गंभीर प्रकार असून, दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही.”
दरम्यान, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यातील खासगी Automated Testing Station (ATS) व्यवस्थेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी ATS केंद्रांमध्ये मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्याबरोबरच संपूर्ण राज्यासाठी एकसमान व कठोर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (SOP) लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे वाहन फिटनेस तपासणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रभावी नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच नियमबाह्य कारभार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होण्याची शक्यता असल्याने वाहन फिटनेस प्रक्रियेत शिस्त आणि विश्वासार्हता वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.








Leave a Reply