मानवत | तालुका प्रतिनिधी – इलियास पठाण
मानवत : शहरातील सफाई कर्मचाऱ्यांचा दि. २७ ऑगस्टपासून सुरू असलेल्या संपामुळे शहरातील विविध भागांत कचरा साचला होता. याची दखल घेत मानवत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दि. १ सप्टेंबर रोजी थेट रस्त्यावर उतरून स्वच्छता मोहीम राबवली.
मुख्याधिकारी कोमल सावरे, नगर अभियंता सय्यद अन्वर यांच्यासह आर. बी. चव्हाण, अजय उरते, दीपक सातभाई, सुनीता वाडकर, वंदना इंगोले, सचिन सोनवणे, रवी दहे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातात खोरे, टोपले घेऊन शहरातील विविध भागांमध्ये प्रत्यक्ष स्वच्छता केली. रस्त्यांवरील तसेच परिसरातील साचलेला कचरा हटविण्यात आला. प्रशासनातील अधिकारी-कर्मचारीच स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्याने शहरातील स्वच्छता मोहिमेला वेग आला आहे.
दरम्यान, मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी नागरिकांना नगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून द्यावा, तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
सफाई कर्मचारी संपावर असताना नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारल्याने नागरिकांमध्येही सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.
















Leave a Reply