तालुका प्रतिनिधी : इलियास पठाण
मानवत, दि. 5 ऑगस्ट 2026
मानवत शहरातील हटकर समाज सभागृह येथे डॉ. अंकुश लाड यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक 7 व 8 मधील नागरिकांसाठी मोफत सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे 950 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
मानवत शहरातील प्रत्येक प्रभागात मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या संकल्पातून डॉ. अंकुश लाड यांनी हे आरोग्य अभियान सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात नागरिकांची विविध आजारांची तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉ. अंकुश लाड यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत आरोग्य अभियानामागील उद्दिष्ट, त्याचे महत्त्व आणि पुढील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. विकासकामांसोबतच प्रत्येक प्रभागात आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शिबिरात तपासणी झालेल्या पात्र रुग्णांना पुढील उपचारासाठी लवकरच मुंबईतील नामांकित रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे. रुग्णांचा प्रवास, राहण्याची व्यवस्था, भोजन तसेच रुग्णालयातील संपूर्ण उपचाराचा खर्च डॉ. अंकुश लाड यांच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. आर्थिक अडचणीमुळे कोणताही गरजू नागरिक उपचारापासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय, शिबिरात आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण मिळावे यासाठी आयुष्मान भारत कार्ड तयार करून देण्याचे कामही करण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नगरसेवक बाजीराव हलनोर, नगरसेवक नियामत खान, रहीमभाई सय्यद, जमीलभाई, अफसरभाई अन्सारी, संजय राणा नाईक यांच्यासह वैद्यकीय तज्ज्ञ, आरोग्य कर्मचारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
मानवत शहरातील प्रत्येक प्रभागात अशाच प्रकारची मोफत आरोग्य शिबिरे सातत्याने आयोजित करण्यात येणार असून प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविणे आणि गरजू रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध करून देणे हा डॉ. अंकुश लाड यांचा संकल्प असल्याचे यावेळी सांगण्यात आले.









Leave a Reply