राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व अभ्यास वर्गाचे आयोजन

परभणी | प्रतिनिधी
ग्राहक जागृती, संघटन बळकटीकरण आणि आगामी वर्षभरातील कामाचे नियोजन या उद्देशाने ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांचे राज्य अधिवेशन दि. ८ व ९ ऑगस्ट २०२६ रोजी शिवराज पॅलेस, वडगाव मावळ (जि. पुणे) येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी परभणी जिल्हा कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात पार पडली.
बैठकीत जिल्हाध्यक्ष धाराजी भुसारे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्राहक चळवळीचा सक्षम व परिपूर्ण कार्यकर्ता घडविण्यासाठी राज्य अधिवेशनात सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. अधिवेशनात वर्षभरातील कार्याचा आढावा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक असलेली अद्ययावत माहिती, संघटन बांधणी तसेच पुढील वर्षभरातील उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र गेल्या १६ वर्षांपासून ग्राहक हक्क संरक्षण, जनजागृती आणि ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनात अभ्यास वर्गासह विविध विषयांवरील मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी समाजभूषण पुरस्कार, अर्थव्यवस्थेचे पंचप्राण पुरस्कार, श्रमिक, व्यापारी, शेतकरी व उद्योग क्षेत्रातील पुरस्कार तसेच उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. न्यायमूर्ती सुरेश तावडे, अध्यक्ष, राज्य ग्राहक तक्रार आयोग यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. विजय लाड राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मा. सुनील अण्णा शेवाळे (आमदार, मावळ), संजय उर्फ बाळा भेगडे (माजी राज्यमंत्री), सुभाष बापू देशमुख (माजी सहकार व उद्योग मंत्री), राजेंद्र पवार (संचालक, मानव संसाधन, महावितरण, मुंबई), सुधीरभाऊ मुनगंटीवार (माजी अर्थमंत्री व आमदार) तसेच कॉ. विलासराव कात्रे (उद्योजक) उपस्थित राहणार आहेत.
पूर्वतयारी बैठकीत जिल्हा संघटक जयंत गायकवाड यांनी अधिवेशनाची रूपरेषा मांडली. जिल्हा संघटक अशोक पवार यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा उपाध्यक्ष देवलिंग देवडे, गोपाळ लाड व कोषाध्यक्ष नितीन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आभार गजानन देशमुख, परभणी तालुका संघटक यांनी मानले.
बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले की, राज्य अधिवेशनात मिळणारे मार्गदर्शन व दिल्या जाणाऱ्या सूचनांनुसार परभणी जिल्ह्यात ग्राहक हक्क संरक्षण व जनजागृतीचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यात येईल.









Leave a Reply