पावसासाठी अल्लाहकडे विशेष दुवा; मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
मानवत / प्रतिनिधी : इलीयास पठाण
मानवत शहर व परिसरात गेल्या जवळपास दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. पावसाअभावी शेतातील हातातोंडाशी आलेल्या पिकांवर संकट निर्माण झाले असून, आगामी काळात पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याची समस्याही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानवत शहर व परिसरात पावसाची नितांत गरज निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर पावसासाठी अल्लाहकडे विशेष प्रार्थना करण्यासाठी नमाज-ए-इस्तिस्काचे आयोजन करण्यात आले आहे. मानवत शहरातील ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना सुलतान मिल्ली, मौलाना सलीम मिल्ली, मौलाना नजीर मिल्ली व मौलाना हमिद आलमगीर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष नमाज अदा करण्यात येणार आहे.
शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.४५ वाजता मानवत येथील मस्जिद मोठी ईदगाह, उक्कलगाव रोड येथे नमाज-ए-इस्तिस्का अदा केली जाणार आहे.
यावेळी पावसासाठी अल्लाहकडे रहमत, बरकत आणि भरपूर पावसाची विशेष दुवा करण्यात येणार आहे. “ऐ अल्लाह, रहमत वाली बारिश नाजिल फरमा… आमीन सुम्मा आमीन” अशी प्रार्थना करत सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी दुवा करण्यात येणार आहे.
मानवत शहर व परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नमाज-ए-इस्तिस्कामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.













Leave a Reply